
सिंधुदुर्गनगरी : कोल्हापूर येथून बदली होऊन आलेले सचिन अडसूळ यांनी सोमवारी (३ ऑगस्ट) सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली झाल्यानंतर अडसूळ यांची सिंधुदुर्ग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर अडसूळ यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, विकासकामे आणि लोकहिताच्या उपक्रमांची माहिती प्रभावीपणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांशी समन्वय ठेवत पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सचिन अडसूळ यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असताना विविध शासकीय उपक्रमांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माहिती विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.











