LIVE UPDATES

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत आरपीडीचा डंका

तालुक्यापासून राज्यापर्यंत विद्यार्थ्यांची चमक : मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 16:06 PM
views 37  views

सावंतवाडी : राज्यस्तरीय (शहरी) गटात राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी प्रशालेची कु. अश्लेषा उद्धव माळवे (९ वी) व कु. सृष्टी गोविंद परब (९ वी)  यांनी चौथा क्रमांक प्राप्त केला. कु. सोहम बापूशेट कोरगावकर याने पाचवा क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय (शहरी) गटात तेजस्वी सगम प्रथम, अमेय आपटे द्वितीय, साक्षी गुरव तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंतांचा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तालुकास्तरीय (शहरी) गटात राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडीची शमिका केदार आणि महादेव परब यांनी प्रथम क्रमांक, जान्हवी मेस्त्री (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी) द्वितीय, अथर्व देवस्थळी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

मराठी भाषा आणि ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे १८०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही यश मिळविले आहे. यामध्ये आपल्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज सावंतवाडी प्रशालेचे घवघवीत यश संपादन केले आहे.

मराठी विश्वकोशातील 'जीवसृष्टी आणि पर्यावरण' या विषयावरील नोंदी परीक्षेसाठी अभ्यासक्रम म्हणून देण्यात आल्या होत्या. १०० गुणांच्या परीक्षेत ५० वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश होता. राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये त्यानंतर १२,५००, १० हजार, ७,५०० आणि ५ हजार रुपयांची अनुक्रमे पारितोषिके आहेत. विजेत्यांना जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग लवकरच समारंभपूर्वक बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह प्रदान करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ सदस्य वामन पंडित यांनी दिली आहे.

या यशस्वितेसाठी व आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल करण तसेच इतर सर्व विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्र. मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्र. उपप्राचार्य सविता कांबळे, पर्यवेक्षक एन.जी.मुठे तसेच पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.