
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अलीकडील काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिस प्रशासनाला निवेदन सादर केले. तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यटनस्थळांवरील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष विनायक सावंत, तालुका सचिव संदीप गवस, मधुसूदन खांबल, सतीश आकेरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गोवा राज्यातून पर्यटनाच्या नावाखाली काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तालुक्यात येऊन दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शहरातील काही नागरिकांवर प्राणघातक हल्ल्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पर्यटन हंगाम सुरू झाल्याने गोवा व कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक दोडामार्गातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. मात्र काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत येत असल्याने इतर पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख पर्यटनस्थळांवर नियमित गस्तीपथके तैनात करून पोलिसांचा प्रभावी बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते सातत्याने कार्यान्वित राहतील याची खात्री करावी, गोवा बनावटीच्या अवैध दारूविक्री व अमली पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता मुख्य रस्त्यावर स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, तसेच मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.













