LIVE UPDATES

सेवानिवृत्त शिक्षक संजय पाताडे यांची कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 19:37 PM
views 35  views

वैभववाडी : सेवानिवृत्त शिक्षक संजय दत्ताराम पाताडे यांची सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना या राज्यस्तरीय संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्ष व जिल्हा सल्लागार  या महत्त्वपूर्ण पदांवर निवड करण्यात आली आहे.निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर व राज्य उपाध्यक्ष गुंडू चव्हाण यांच्या हस्ते पाताडे यांना प्रदान करण्यात आले. 

श्री. पाताडे हे नुकतेच सेवा निवृत्त झाले. गेली ३७वर्षे ते शिक्षण क्षेत्रात काम करीत होते.त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा संघटनेला व्हावा यासाठी त्यांची ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन पाताडे यांचा सत्कार केला. महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. या निवडीबद्दल बोलताना श्री. पाताडे म्हणाले, "सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना राज्यभर प्रभावीपणे कार्यरत आहे. जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांच्या सहकार्याने संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मी कायम तत्पर राहीन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्याध्यक्ष धोंडू बाबू रेडकर, सरचिटणीस नितीन जठार, कुडाळ तालुका अध्यक्ष उदय शिरोडकर, महिला अध्यक्षा वसुंधरा गुंडू चव्हाण, महिला जिल्हा उपाध्यक्षा सिद्धी संजय पाताडे, कणकवली तालुका सरचिटणीस कोचरेकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कोलते, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ बोभाटे, तालुका सरचिटणीस प्रशांत रासम तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.