
देवगड : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीमध्ये विधान परिषद सदस्य आ. प्रमोद जठार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १८ मे २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. या समितीच्या माध्यमातून राज्यातील महसूल समाधान शिबिरांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, शिबिरांच्या यशस्वीतेचा आढावा घेणे, प्रत्यक्ष पाहणी दौरे करणे तसेच स्थानिक प्रशासन व अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन आवश्यक निर्णय घेणे अशी जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध जिल्ह्यांसाठी समिती सदस्यांची नियुक्ती केली असून आमदार प्रमोद जठार यांच्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महसूल विषयक नागरिकांच्या तक्रारी व प्रश्न अधिक वेगाने निकाली निघण्यास मदत होणार आहे.












