LIVE UPDATES

अक्षय पार्सेकर यांच्या इशाऱ्याची दखल ; निकृष्ट जोड रस्ता दुरुस्तीचे काम सुरू

Edited by: विनायक गांवस
Published on: June 14, 2026 17:43 PM
views 56  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. न्हावेलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या तीव्र उपोषणाच्या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अखेर आजपासून या वादग्रस्त जोड रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

न्हावेली जोड रस्त्याच्या (किलोमीटर ०० ते ३.४०) खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामात कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे मोठे साठलोट असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. रस्त्याचे काम करताना सर्व नियम व निकष धाब्यावर बसवण्यात आले होते. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच त्यावर ठीकठिकाणी मोठे खड्डे पडले होते, तसेच रस्त्यालगतच्या गटारांची अवस्थाही तशीच ठेवून काम अर्धवट सोडण्यात आले होते. विशेष म्हणजे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मुदत ३० मे २०२६ रोजी संपली होती. वारंवार कळवूनही कंत्राटदाराने कामाची दुरुस्ती केली नव्हती. जोड रस्ते आणि लगतच्या घरांमध्ये पाणी जाण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईप्सच्या दोन्ही बाजूंना सिमेंट-दगडांचे मजबूत बांधकाम (पिचिंग) करणे बंधनकारक होते. मात्र, कंत्राटदाराने केवळ पाईप टाकून त्यावर वरवर माती टाकण्याचे अत्यंत थातूरमातूर काम केले होते. यामुळे पावसाळ्यात हे पाईप वाहून जाण्याची किंवा रस्ता खचण्याची तीव्र भीती निर्माण झाली होती. या निकृष्ट कामाची १५ दिवसांत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर व ग्रामस्थांनी दिला होता. यासंदर्भात कुडाळ येथील कार्यकारी अभियंत्याकडे थेट लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. ग्रामस्थांचा हा आक्रमक पवित्रा पाहून अखेर संबंधित यंत्रणा जागी झाली. प्रशासनाने कंत्राटदाराला तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा प्रलंबित प्रश्न सुटल्याने न्हावेली परिसरातून मोठे समाधान व्यक्त होत आहे.