LIVE UPDATES

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या निवेदनाची दखल

तालुका स्कूल व कन्या शाळेच्या इमारतीची दुरुस्तीचे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे प्रशासनाला आदेश
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 14, 2026 18:03 PM
views 20  views

कुडाळ : कुडाळ शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 'तालुका स्कूल' आणि 'कन्या शाळा' यांच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, असे कडक आदेश सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसेना कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी या गंभीर समस्येकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्यानंतर सभापतींनी ही तात्काळ कारवाई केली.

कुडाळ शहरातील तालुका स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांसाठी एका सुसज्ज सभा मंडपाची (प्रार्थना मंदिर/हॉल) अत्यंत आवश्यकता आहे. तसेच, याच परिसरात असलेल्या कन्या शाळेच्या इमारत क्रमांक २ ची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, तिचे छप्पर पूर्णपणे मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात किंवा इतर वेळीही या नादुरुस्त इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून अध्यापन करणे अत्यंत धोक्याचे आणि कठीण बनले आहे. हीच बाब लक्षात घेऊन शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेतली. त्यांनी शाळेच्या या दुरवस्थेबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांना दुरुस्तीचे निवेदन सादर केले.

निवेदनाचे गांभीर्य ओळखून शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ संबंधित शिक्षण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती आणि सभा मंडपाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी कुडाळचे नगरसेवक विलास कुडाळकर, उपशहरप्रमुख प्रथमेश केळबाईकर, अनुप शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण सभापतींच्या या तत्परतेमुळे कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा प्रश्न सुटणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.