LIVE UPDATES

नामवंत कवी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांचे निधन

सिंधुदुर्गच्या शैक्षणिक - साहित्यिक क्षेत्रात पोकळी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 13:29 PM
views 64  views

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, नामवंत कवी  प्रा. डॉ. नामदेव गवळी (वय ५८)यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री.गवळी हे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील रहिवासी आहेत. ते सन १९९२ पासून वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गेली ३४वर्षे ते ज्ञानार्जनाच काम करीत होतं. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. गवळी हे मराठी साहित्यविश्वातील एक मान्यवर कवी म्हणून ओळखले जात होते. त्यांचा ‘भातालय’ हा कवितासंग्रह विशेष गाजला असून या काव्यसंग्रहाला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

त्यांच्या या काव्यसंग्रहातील कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला अभ्यासक्रमात तसेच शिवाजी विद्यापीठाशी संलग्न विवेकानंद महाविद्यालयाच्या बी.ए. प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात करण्यात आला होता.

प्राध्यापक, कवी आणि साहित्यिक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाने एक संवेदनशील कवी आणि अभ्यासू प्राध्यापक गमावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.