
सावंतवाडी : संगीताचे नानाविध प्रकार आहेत. बालपणापासून ते मोठे होण्यापर्यंत आपण विविध गीतांमधून संगीताविषयीं ऐकले आहे. आनंद, राग, भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. मन मोकळे करण्यासाठी संगीताचा वापर केल्यास आपल्यावर आलेला ताणतणाव निश्चितपणे दूर करता येऊ शकतो व माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत व रोटरी क्लबचे उचगांवकर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग समता सप्ताह निमित्ताने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी आयोजित 'जीवन संगीत गुरूकुल' या प्रसिद्ध म्युझिक थेरपीस्ट डॉ. संतोष बोराडे यांनी केले.
डॉ. बोराडे पुढे म्हणाले, आपली प्रकृती सुदृढ असताना संगीत ऐकणे गरजेचे आहे. यामुळे आपली प्रबोधन होते व आध्यात्मिक शक्ती वाढते. स्वतःमधील गुण विकसित करता येतात. तर विद्यार्थ्यांसाठी चांगला माणूस म्हणून तयार होण्याची क्षमता संगीतामध्ये आहे. संगीत ऐकताना आपण काय ऐकले पाहिजे याचा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. वाद्य वाजवणे म्हणजे संगीत नाही. आईचे अंगाई गीत, आपण म्हटलेली कविता, आपल्याला आवडलेली गाणी, पारंपरिक लोकगीते हे सुद्धा संगीतच आहे. आपल्या आयुष्यातील संगीत आपण शोधले पाहिजे. संगीतामधून माणसाला चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची शक्ती मिळते. तो घाबरून न जाता त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतो.
कार्यक्रमाचे सुरूवातीला प्रास्ताविक करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी 'जीवन संगीत गुरुकुल' या कार्यक्रमाचे उद्देश व हेतू सांगून या कार्यक्रमाचा विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे सांगून कार्यक्रमाला शुभेच्छा दिले. तर शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संचालक प्रा. सतीश बागवे मनोगत व्यक्त करताना, खूप खोलवर विचार केल्यास मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी कारणीभूत ठरते ते संगीत आहे. तेव्हा आपण सर्वांनी प्रसिद्ध म्युझिक थेरपीस्ट डॉ. संतोष बोराडे यांच्या या मार्गदर्शनाचा अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे खजिनदार सी.एल. नाईक, संचालक प्रा.सतीश बागवे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेध नाईक, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे,प्रा. सविता माळगे,प्रा.डाॅ.अजेय कामत,प्रा.रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे ,प्रा.दशरथ सांगळे, प्रा.माया नाईक,प्रा.सृहा टोपले,प्रा.निलेश कळगुंटकर , प्रा. राहुल कदम इ. सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलिंद कासार यांनी केले तर आभार प्रा.केदार म्हसकर यांनी मानले.












