
सिंधुदुर्ग : संपूर्ण कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि पवित्र वातावरणात साजरा होणाऱ्या 'गणेशोत्सव' महापर्वाच्या पार्श्वभूमीवर, घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तथा युवासेना नेते मंदार शिरसाठ यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासनाला नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा यादृष्टीने गणेशोत्सवाच्या बऱ्याच आधी हे निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्यासह नगरसेवक संतोष शिरसाठ, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, अमित राणे, शैलेश काळप, संदीप म्हाडेश्वर आणि गुरु गडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन या मागण्यांवर कसा निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
सणासुदीच्या या दिवसांत मुंबई, पुणे व इतर शहरांमधून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल होतात. घराघरांमध्ये पाहुण्यांची रेलचेल वाढल्याने तसेच महाप्रसाद आणि विविध पक्वान्ने बनवण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर नेहमीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढतो. मात्र, ग्रामीण भागात लागू असलेल्या २५ दिवसांच्या गॅस बुकिंगच्या नियमामुळे ऐन सणात नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवत, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात घरात माणसांची संख्या वाढल्याने गॅस लवकर संपतो. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या काळात घरगुती सिलिंडरची २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करून नागरिकांना गरजेनुसार त्वरित सिलिंडर बुक करण्याची मुभा द्यावी. सणाच्या काळात हॉटेल्स, खानावळी, उपहारगृहे, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा भासू नये यासाठी गॅस कंपन्यांनी जिल्ह्यात अतिरिक्त साठा उपलब्ध करून ठेवावा.
"गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या सणात गॅसअभावी कोणत्याही कुटुंबाला किंवा व्यावसायिकाला अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने गॅस कंपन्यांशी तातडीने समन्वय साधून योग्य व आगाऊ नियोजन करावे."
मंदार श्रीकृष्ण शिरसाठ (नगरसेवक तथा युवासेना नेते)










