LIVE UPDATES

कॅन्सरवर गुणकारी ‘नर्क्‍या’ वनस्पतीचे कुडाळमध्ये जतन व लागवड

सावंतवाडी वनविभागाचा वनमहोत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम : नेरूरमध्ये ७०० रोपांची लागवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 17:02 PM
views 54  views

कुडाळ : सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात वनमहोत्सवांतर्गत वृक्ष लागवडीचे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा, सहायक वनसंरक्षक सुनील लाड आणि कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्रांतर्गत विविध भागात वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत कुडाळ वनपरिक्षेत्रातील नेरूर वनपरिमंडळात वनक्षेत्रामध्ये ही विशेष वृक्ष लागवड केली जात असून, याठिकाणी मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे.

या मोहिमेचे मुख्य आकर्षण म्हणजे या भागात ‘नर्क्‍या’ या बहुमूल्य आणि अत्यंत गुणकारी औषधी वनस्पतीची लागवड केली जात आहे. नेरूर परिसरात नर्क्‍याच्या तब्बल ७०० रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी वनविभातर्फे घेण्यात आली आहे. नर्क्‍या ही वनस्पती कॅन्सरसारख्या अत्यंत घातक आणि गंभीर आजारावरील उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. या वनस्पतीची साल, खोड आणि मुळे यांचा औषधी उपचारांमध्ये प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे या दुर्मीळ वनस्पतीचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे.

केवळ रोपांची लागवड न करता त्यांचे योग्य संगोपन करून ती वाढविण्यावर वनविभातर्फे भर दिला जात आहे. या संपूर्ण उपक्रमाची माहिती नेरूर तर्फ हवेलीचे वनपाल सूर्यकांत सावंत यांनी दिली. वनविभागाच्या या पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.