
वैभववाडी : खांबाळे (भुतलवाडी) येथे दारू अड्यावर पोलीसांनी छापा टाकला आहे. यावेळी दारूची विक्री करणाऱ्या दर्शन चंद्रकांत पवार (वय ३६) याला वैभववाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आठ हजार चारशे रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या १२० बाटल्या जप्त करण्यात आल्या. सोमवारी (ता. २७) सायंकाळी सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या २० दिवसांतील एकाच व्यक्तीवरील ही दुसरी कारवाई आहे.
खांबाळे गावात ८ जुलैला दारु अड्यावर पोलीसांनी छापा टाकला होता. या कारवाई नंतर गावातील अवैध दारूविक्री कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखी ठराव करून दारूबंदीची भूमिका घेतली होती. यासंदर्भात ग्रामस्थांनी वैभववाडी पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. मात्र, त्यानंतरही भुतलवाडी परिसरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हरेष जायभाय, जितेंद्र कोलते, संदीप राठोड, रणजित सावंत, रणजित दबडे, सोनल गोसावी तसेच पोलिस पाटील रूपेश कांबळे यांनी सोमवारी रात्री पावणे आठ वाजता छापा टाकला. या कारवाईदरम्यान दर्शन पवार हा दारूची विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील आठ हजार चारशे रुपये किमतीच्या १२० गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी दर्शन पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत. गेल्या वीस दिवसांत खांबाळे (भुतलवाडी) येथील दर्शन पवार यांच्या विरोधात अवैधरित्या दारू विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे.











