
राजापूर : तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची विक्री आणि अवैध दारू व्यवसायाविरोधात तक्रार केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने कथितरीत्या शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, राजापूर तालुका गोवा बनावटीच्या दारूपासून मुक्त करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
तक्रारीनंतर अधिकाऱ्याच्या कथित शिवीगाळीचा आरोप
भाजपचे युवा तालुकाध्यक्ष सिद्धेश ठळश्री यांनी नाटे गावातील गोवा बनावटीच्या दारूच्या संदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीला उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप ठळश्री यांनी केला आहे. तसेच, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्याने मी कारवाई करायचा ठेका घेतला काय? असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकारानंतर सिद्धेश ठळश्री यांनी राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांना दूरध्वनीवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी अभिजीत गुरव हे पंचायत समितीच्या दालनात उपस्थित होते. त्यांनीही संबंधित उत्पादन शुल्क अधिकाऱ्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनाही आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप अभिजीत गुरव यांनी केला आहे.
संबंधित अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना तो दारूच्या नशेत असल्याचा संशय आल्याचे अभिजीत गुरव यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकारी क्रांती शेडगे यांना देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी आणि प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
लांजा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
या घटनेच्या निषेधार्थ राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव, नाटे गावचे सरपंच संदीप बांधकर, सचिन बनकर, सिद्धेश ठळश्री, भाजपचे लांजा तालुकाध्यक्ष विराज हरमळे, राजापूर तालुकाध्यक्ष मोहन घुमे, सरचिटणीस बेंडले आणि माजी नगरसेवक संजय यादवराव यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लांजा येथील उत्पादन शुल्क कार्यालय गाठले.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या प्रकरणाची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करावी, या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
चार दिवसांत छापे टाकण्याचे आश्वासन
या आंदोलनाची दखल घेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अमित पाडाळकर यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधला. त्यांच्या विनंतीला मान देत अभिजीत गुरव यांनी त्यांना लांजा येथे प्रत्यक्ष येण्याची विनंती केली. त्यानुसार पाडाळकर यांनी लांजा येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली आणि पुढील कार्यवाहीबाबत लेखी पत्र दिल्याचे सांगण्यात आले.
पुढील चार दिवसांत राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात छापे टाकून अवैध दारू व्यवसायावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे अभिजीत गुरव यांनी सांगितले. मात्र, केवळ छापे टाकण्याचे आश्वासन देऊन संबंधित अधिकाऱ्यावरील आरोपांकडे दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीवर ते ठाम होते.
'रक्षकच भक्षक होत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा?'
राजापूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या दारूचा अवैध व्यवसाय रोखणे अत्यंत गरजेचे आहे. या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, विषारी दारूमुळे तरुणांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच कथितरीत्या शिवीगाळ केली जात असेल, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारच्या भाषेचा सामना करावा लागत असेल, तर हे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा उपसभापती अभिजीत गुरव यांनी दिला.
१५ दिवसांत तरुणाई रस्त्यावर उतरणार
राजापूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या दारूचा अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. संबंधित अधिकाऱ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अभिजीत गुरव यांनी केली.
येत्या १५ दिवसांत राजापूर तालुक्यातील गोवा बनावटीच्या दारूचा अवैध व्यवसाय बंद झाला नाही, तर तालुक्यातील तरुणाईला सोबत घेऊन व्यापक आंदोलन छेडण्यात येईल. वेळ पडल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचे आंदोलनही केले जाईल, असा इशारा गुरव यांनी दिला.
तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी हा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








