LIVE UPDATES

पावसाचा कहर; सिंधुदुर्गला ९२.७३ लाखांचा फटका

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मोठा फटका ; पावसामुळे जीवितहानी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 07, 2026 18:06 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी :  जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोठी वित्तहानी केली असून, १ जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे तब्बल ९२ लाख ७३ हजार ३२७ रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. या काळात २१२ घरांसह गोठे, मांगर, पोल्ट्री व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद असून, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात नुकसानीचा आलेख झपाट्याने वाढला आहे.

पावसामुळे जीवितहानी  देखील झाली आहे. यात 30 जून रोजी जामसंडे पाटकरवाडी देवगड येथे घराची संरक्षण भिंत पडून श्रीम.सुनंदा कावले ह्या जखमी झाल्या. तर २ जुलै रोजी गाव आकेरी, कुडाळ येथील गणेश पुंडलिक पालव हे गुरे चरायला घेऊन गेले असता शेतातील वहाळात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला. ३ जुलै रोजी सकाळी 9 वाजता या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. 5 जुलै रोजी सकाळी 5.30 ते 6.00 च्‍या दरम्‍यान जतिन चंद्रकांत कोचरेकर, रा.तांबळडेग, मधलीवाडी ता.देवगड ही व्यक्‍ती तांबळडेग खाडीत मासेमारीसाठी गेली होती. ‍व्यक्तीचा मृतदेह सकाळी 9.30 वाजता गावातील व्‍यक्‍तींना तांबळडेग समुद्र किना-यावर आढळून आला. शवविच्छेदन अहवालानुसार या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रशासनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, १७० पक्की घरे अंशतः, २६ कच्ची घरे अंशतः, तर ४ कच्ची घरे पूर्णतः बाधित झाली आहेत. याशिवाय २ मांगर, १ पोल्ट्री, ४ खासगी मालमत्ता आणि ६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, १ जून ते ३० जून या कालावधीत जिल्ह्यात २४ लाख १२ हजार ३४८ रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये २२ पक्की घरे, ८ कच्ची घरे आणि ३ गोठ्यांचे नुकसान नोंदविण्यात आले होते.मात्र १ जुलै ते ७ जुलै या अवघ्या सात दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढल्याने ६८ लाख ६० हजार ९७९ रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले. या काळात १४८ पक्की घरे, १८ कच्ची घरे अंशतः, ४ कच्ची घरे पूर्णतः बाधित झाली. तसेच २ मांगर, १ पोल्ट्री, ४ खासगी मालमत्ता आणि ३ गोठ्यांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.जिल्हा प्रशासनाकडून बाधित ठिकाणी पंचनाम्याचे काम सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंतिम पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१ ते ७ जुलै या सात दिवसांतच जून महिन्याच्या तुलनेत जवळपास तिप्पट नुकसान झाले आहे. एकूण ९२.७३ लाख रुपयांच्या नुकसानीपैकी तब्बल ६८.६१ लाख रुपयांचे नुकसान जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाले असून, या काळात सर्वाधिक घरे, गोठे आणि इतर मालमत्ता बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.