LIVE UPDATES

अखेर वरुणराजाची दमदार हजेरी

देवगड तालुका ठरला ‘वर्षावाचा बादशाह’
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 23, 2026 13:08 PM
views 28  views

सिंधुदुर्गनगरी : यंदा मान्सूनचे आगमन जाहीर झाले असले तरी पावसाने मात्र पाठ फिरवल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण चिंतेत होता. जून महिना अर्ध्याहून अधिक संपूनही पावसाचा थेंब न पडल्याने शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले होते. मात्र मराठी पंचांगातील अधिक महिना संपताच वरुणराजाने अखेर जिल्ह्यात दमदार हजेरी लावत सर्वांना दिलासा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी आणि मंगळवारी जोरदार रूप धारण केले. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये देवगड तालुक्यात सर्वाधिक १२६ मिलिमीटर पाऊस कोसळला असून, जिल्ह्यातील पावसाच्या हंगामाची दमदार सुरुवात झाली आहे.

यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यातच जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत पावसाचा पत्ताच नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीची रखडलेली कामे, बागायती पिकांचे भविष्य आणि जनावरांच्या चाऱ्याची चिंता सर्वांनाच सतावत होती. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते.

अशा परिस्थितीत रविवारी पावसाचे आगमन झाले आणि सोमवारी त्याने सातत्य राखत जिल्हाभर जोरदार बरसात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भातशेतीसाठी मशागत, नांगरणी, रोपवाटिका आणि इतर शेतीकामांना आता वेग आला असून ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमीमध्ये)

तालुका | पाऊस (मिमी)

देवगड 126

कुडाळ 103

वैभववाडी  97

कणकवली 90

सावंतवाडी  87

दोडामार्ग  80

मालवण 34

वेंगुर्ला 30

जिल्ह्याची सरासरी : ८०.८७ मिमी

शेतीकामांना वेग

पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने भातपेरणीच्या तयारीला वेग आला आहे. अनेक भागांत शेतकरी शेतात उतरले असून रखडलेली कृषी कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचे सातत्य कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.