
पालकांनी पुकारला एल्गार
सावंतवाडी : सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ मधील पदवीधर शिक्षकांचे नाव अतिरिक्त ठरवून समायोजन यादीत समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाकडून या गंभीर समस्येची दखल न घेतली गेल्याने अखेरचा पर्याय म्हणून ग्रामस्थांनी उद्या २३ जून पासून थेट 'शाळा बंद आंदोलन' करण्याचा निर्णय घेतला असून, तसे लेखी निवेदन सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांना सादर केले आहे.
शाळेत सद्यस्थितीत दोन पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या संचमान्यतेनुसार या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका तथा पदवीधर शिक्षक सृष्टी धुरी यांना 'अतिरिक्त' ठरवण्यात आले असून, त्यांचे नाव समायोजन यादीत टाकण्यात आले आहे. या निर्णयामुळे शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावण्याची आणि विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये शाळेत इयत्ता ६ वी आणि ७ वीची एकूण पटसंख्या २१ इतकी असून, पुढील वर्षांतही ही संख्या २१ पेक्षा अधिक राहणार आहे. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक संचमान्यतेचे कारण पुढे करून शिक्षकांची बदली करण्याचा घाट घातला जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने यापूर्वी प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून वस्तूस्थिती समजावून सांगितली होती आणि समायोजन यादीतून शाळेचे नाव कमी करण्याची विनंती केली होती. परंतु, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाने या रास्त मागणीचा विचार करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशासनाच्या या संवेदनशून्य आणि आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेरचा पर्याय म्हणून शाळा बंद करण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी सोनुर्ली सरपंच नारायण तुकाराम हिराप, उपसरपंच भरत जयराम गावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंजिरी गावकर आणि उपाध्यक्ष सखाराम कुडतरक, ग्रामपंचायत सदस्य नागेश गावकर, नरेश मोर्ये,अरुण जाधव, तेजस गावकर, विष्णू जाधव आदी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर इतर ३५ हून अधिक ग्रामस्थ व पालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जोपर्यंत संबंधित शिक्षक सृष्टी धुरी यांचे नाव समायोजन यादीतून वगळले जात नाही, तोपर्यंत शाळा बंद आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.










