LIVE UPDATES

रेल्वे टर्मिनसला ‘मधु दंडवते’ नाव

सावंतवाडीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा जल्लोष
Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2026 18:17 PM
views 98  views

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या टर्मिनसचे नाव आता "लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस" असे होणार असून राज्य सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोकणातील जनतेची आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या ऐतिहासिक निर्णयाचे वृत्त समजताच सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने शहरात व रेल्वे स्थानकावर पेढे वाटून, तर गांधी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर उपस्थित होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टर्मिनसच्या दोन टप्प्यांतील विकासासाठी १८ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, पहिल्या टप्प्याचे काम झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते.


सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या मागणीसाठी सुरुवातीला माजी आमदार जयानंद मठकर आणि दीपक केसरकर यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाले आणि टर्मिनस कामाला वेग आला. मात्र, त्यानंतर रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी ॲड. संदीप निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 'सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना' स्थापन करण्यात आली. यामध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर तसेच सचिव मिहीर मठकर व इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

संघटना स्थापन झाल्यापासून सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात मोठी चळवळ उभी करण्यात आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि परिवहन मंत्र्यांपर्यंत सातत्याने ई-मेल, निवेदने आणि आंदोलनांद्वारे पाठपुरावा करण्यात आला. सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देणे, रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे आणि स्थानकावर पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने सातत्यपूर्ण लढा दिला. दरम्यान, कासवगतीने रेल्वे स्थानकांवर काम सुरू आहे. दरम्यान, कॅबिनेटच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर, प्रशांत जयानंद मठकर, अभिमन्यू लोंढे, रेल्वे स्थानक रिक्षा संघटना पदाधिकारी व अन्य पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर जाऊन प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना पेढे वाटले. .


रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला आणि सातत्यपूर्ण मागण्यांना आज मोठे यश आले आहे. मठकर कुटुंबाने पुढाकार घेऊन सुरुवातीला सावंतवाडी स्थानकावर प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र लावले होते, त्यानंतर कोकणातील ११ रेल्वे स्थानकांवर तैलचित्रे लावण्यासाठी निवेदने दिली होती. प्रवासी संघटनेच्या चळवळीमुळेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विकासाला गती मिळत आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो.खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांचे आम्ही आभार मानतो. रेल्वे टर्मिनस विकासाची नांदी सुरू झाली असे मानतो असे मत संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केले.