LIVE UPDATES

श्रीराम विद्यामंदिर पडेल इथं 'कौशल्य बहुविध अभ्यासक्रमाचा' शुभारंभ

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 26, 2026 19:54 PM
views 9  views

देवगड : बदलत्या काळाची पावले ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे या उद्देशाने, पडेल ग्रामसुधारणा मंडळ मुंबई संचलित श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून 'कौशल्य बहुविध अभ्यासक्रम' (Multi-Skill Course) सुरू करण्यात आला आहे. या नूतन वर्गाचा शानदार शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

​दीक्षित फाउंडेशनचे निरंजन दीक्षित आणि दुरावंत इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती अंजली जायभाय यांच्या शुभहस्ते या बहुविध कौशल्य वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे दीक्षित फाउंडेशनचे श्री. निरंजन दीक्षित आणि दुरावंत इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मॅडम अंजली जायभाय यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी दिल्याबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले.

​अंजली जायभाय (व्यवस्थापकीय संचालिका, दुरावंत इंडिया)

​"आजच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. उद्योगांना आज कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पडेलसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी तांत्रिक दृष्ट्या सक्षम बनतील आणि त्यांच्यात उद्योजकता निर्माण होईल."

​अशोक पाटणकर (अध्यक्ष, पडेल ग्रामसुधारणा मंडळ):

​"ग्रामीण भागातील मुलांना अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हे आमच्या मंडळाचे नेहमीच ध्येय राहिले आहे. दीक्षित फाउंडेशन आणि दुरावंत इंडियाच्या सहकार्यामुळे आज हे मोठे पाऊल पडत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे."

​ दीपक पडेलकर, चेअरमन, शाळा समिती

​"कौशल्य अभ्यासक्रम हा या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी याचा पूर्ण लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे. शाळेच्या प्रगतीत हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल."

​या सोहळ्याला पडेल ग्रामसुधारणा मंडळाचे सचिव जितेंद्र मांजरेकर, खजिनदार दत्ताराम बाणे, कार्याध्यक्ष संदीप तानवडे, शाळा समिती सदस्य संजय घाडी, आणि मंडळाचे सदस्य गणेश हर्याण उपस्थित होते.

​तसेच दुरावत इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश नाईक, देवेंद्र सोरटे, योगेश गुप्ता आणि दिवाकर; तर दीक्षित फाउंडेशनचे निमंत्रक सुरेश देवळेकर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

​कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापक हिराचंद तानवडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक गणेश परब व प्रणय किंजवडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक या सोहळ्याचे साक्षीदार बनले. या नवीन उपक्रमामुळे पडेल परिसरातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.