LIVE UPDATES

सिंधुदुर्गच्या मुख्यालयातीलचं रस्त्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष ?

नादुरुस्त रस्ते ठरतायत जीवघेणे
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 26, 2026 20:00 PM
views 9  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते नादुरुस्त झाल्याने वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावरील खड्डे उघडे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गनगरीमधील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे पाणी साचलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी होऊ लागली आहे. येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन त्यात अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. हा गेल्या काही वर्षातील इतिहास आहे. यासाठी आंदोलनेही झाली आहेत. तरीही  प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे हजारो नागरिक, कर्मचारी, पदाधिकारी आणि प्रमुख अधिकारीही या रस्त्यावरून रोज प्रवास करीत आहेत. असे असतानाही या रस्त्यांची दुरवस्था होणे म्हणजे या जिल्ह्याच्या प्रतिमेला डाग लावणारी समस्या आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथील रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती असेल? याचा अंदाज येतो. दरवर्षी केवळ पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आश्वासन प्रशासनाकडून दिले जाते, प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होताना दिसत नाही. येथील आकाशवाणी केंद्रासमोरील रस्ता, शरद कृषी भवन ते ओरोस बस स्थानक रस्ता, तसेच गरुड सर्कल कडे जाणारा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नादुरुस्त झाला आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन या सर्व रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी. अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.