
सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड गावात कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने गावातील काही वाड्यांमध्ये घरगुती उपकरणे, शेती पंप, व्यावसायिक उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्य करत नाहीत. ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा पंप ही कार्यान्वित होत नाहीत.यामुळे नळ धारकांना पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतला अडचणी येतात. कमी दाबामुळे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी येत आहेत. तसेच मळेवाड मसूरकरवाडी, नाईकवाडी, हेदुलवाडी ठिकाणच्या वीज ग्राहकांना एक लाइन जात असून कमी दाबामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत.
तसेच ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे तालुका सावंतवाडी या ठिकाणच्या सावळवाडी केरकरवाडी,शिरसाटवाडी चराटकरवाडी, मुरकरवाडी, परबवाडी, राणेवाडी या परिसरात कमी विजेचा दाब असल्याने या ठिकाणी 25 केवी क्षमतेचा असलेला ट्रान्सफॉर्मर बदलून तात्काळ त्या ठिकाणी शंभर केवी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा व ज्या वाड्यांमध्ये एक लाईन जाणे किंवा कमी विजेचा दाबामुळे समस्या भेडसावत आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी पंचायत समिती सदस्या धनश्री हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी कुडाळ यांना निवेदन देऊन केली आहे.










