LIVE UPDATES

​मुंबईचे नवनियुक्त उपमहापौर संजय घाडी यांचा पडेल इथं नागरी सत्कार

'कौशल्य विकास' वर्गांना दिली भेट
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 26, 2026 19:51 PM
views 20  views

​देवगड : आपल्या पडेल गावचे सुपुत्र आणि मुंबई शहराचे नवनियुक्त उपमहापौर श्री. संजय घाडी यांचा स्थानिक शाळेत ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला. मुंबईच्या उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

​सत्काराला उत्तर देताना उपमहापौर संजय घाडी यांनी गावाशी असलेले आपले ऋणानुबंध व्यक्त केले आणि गावाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली.

​या विशेष सोहळ्याला शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पडेल ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक पाटणकर, सचिव श्री. जितेंद्र मांजरेकर, खजिनदार श्री. दत्ताराम बाणे, आणि कार्याध्यक्ष संदीप तानवडे यांनी उपस्थित राहून नवनियुक्त उपमहापौरांचे अभिनंदन केले. शाळा समितीचे चेअरमन श्री. दीपक पडेलकर, सदस्य संजय घाडी, आणि मंडळाचे सदस्य गणेश हर्याण यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.

​'कौशल्य विकास' वर्गाची पाहणी

​सत्कार समारंभानंतर उपमहापौर आणि सर्व मान्यवरांनी शाळेत सुरू असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रम (Skill Development) वर्गास भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

​याप्रसंगी कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर म्हणजेच दुरावत इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. गणेश नाईक, देवेंद्र सोरटे, योगेश गुप्ता आणि दिवाकर उपस्थित होते. तसेच दीक्षित फाउंडेशनचे निमंत्रक श्री. सुरेश देवळेकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

​"आपल्या गावातील व्यक्ती जेव्हा मुंबईसारख्या महानगराचे उपमहापौरपद भूषवते, तेव्हा तो संपूर्ण गावाचा गौरव असतो. संजय घाडी यांच्या माध्यमातून पडेल गावाचे नाव अधिक मोठे होईल यात शंका नाही."

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला पडेल गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.