
सावंतवाडी : गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या परब कुटुंबियांना मांद्रे मोरजी मार्गावर तेथील स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. त्याचा निषेध म्हणून युवासेनेचे पदाधिकारी सुरज परब यांच्यासह काही जणांनी सोमवारी सायंकाळी बांदा येथे महामार्ग रोखला होता. या प्रकरणी महामार्गाच्या मध्यभागी गाडी आडवी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी ४ जणांवर बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस हवालदार प्रदीप नाईक यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुरज प्रकाश परब (वय ३३, रा. तळवडे), संकेत शेखर परब (वय ३२, रा. सांगली), अनिकेत शेखर परब( रा. सांगली ), क्लेट्स फर्नांडिस (वय ३६, रा. सावंतवाडी) यांच्यावर बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास युवासेना पदाधिकारी सूरज परब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची गाडी एमएच १० इआर ७००८ मुंबई-गोवा महामार्गावर, महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ रस्त्यावर आडवी लावली. यामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
गाडी आडवी लावल्यानंतर त्यांनी , "गोव्यातील गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही," अशी मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग केला. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप नाईक यांच्या तक्रारीवरून सूरज परब यांच्यासह चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धनंजय नाईक करत आहेत.










