
खारेपाटण : खारेपाटण तालुका निर्मितीची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी ग्रामपंचायत कापडी पिशव्यांच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. ‘खारेपाटण तालुका होणे ही काळाची गरज आहे’ असा संदेश देत ग्रामपंचायतीच्या वतीने तब्बल १ हजार कापडी पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पिशव्यांचे वाटप २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुका निर्मिती मेळाव्यात करण्यात येणार आहे.
खारेपाटण परिसराचा सर्वांगीण विकास, नागरिकांना प्रशासकीय सुविधा जवळच्या अंतरावर उपलब्ध होणे आणि परिसराच्या विकासाला अधिक गती मिळणे यासाठी खारेपाटण तालुका निर्मितीची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी जनजागृती करत ग्रामपंचायतीने कापडी पिशव्यांवर तालुका निर्मितीचा संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने आज खारेपाटण ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद सदस्य प्राची इस्वलकर, सरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत, सचिव संतोष पाटणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले उपस्थित होते. २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तालुका निर्मिती मेळाव्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन खारेपाटण तालुका निर्मितीच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.










