युवराज्ञी श्रद्धाराजे सावंतवाडीच्या महिला नगराध्यक्ष

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2025 18:49 PM
views 195  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १ हजार ३६३ एवढं मताधिक्य घेत विजयी झाल्या. थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून येत त्या चौथ्या महिला नगराध्यक्षा ठरल्या आहेत. तसेच २० सदस्य पदासाठी भाजपचे ११, शिवसेना ७, उबाठा शिवसेना १ व कॉग्रेसचा १ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले. 

नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात होते. यात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी ५ हजार ७८८ मत घेत विजयश्री खेचून आणला. तर शिवसेनेच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर ४ हजार ४२५, उबाठा शिवसेनेच्या उमेदवार सीमा मठकर २ हजार १८४, कॉग्रेसच्या साक्षी वंजारी ५७६,  अपक्ष अन्नपूर्णा कोरगावकर ३३६, निशाद बुराण ५४ मत घेतली. तर ११२ जणांनी नोटाचा  पर्याय निवडला. 

प्रभाग १ मधून भाजपच्या दिपाली भालेकर ४२० मत घेत निवडून आल्या. कॉग्रेसचे तौकीर शेख यांनी ३९२ मत घेत भाजपचे माजी नगरसेवक राजू बेग यांचा ९५ मतांनी पराभव केला. प्रभाग २ मधून सुनिता पेडणेकर यांनी ७७३ मत घेत विजयी झाल्या. तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा १५६ मतांनी पराभव करत शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर विजयी झाले. प्रभाग ३ मधून भाजपच्या मोहीनी मडगावकर यांनी ७१८ मतांसह विजय खेचून आणला. माजी नगरसेविका दिपाली सावंत यांचा त्यांनी पराभव केला. ५७२ मतांसह आनंद नेवगी निवडून आले. प्रभाग ४ मधून शिवसेनेच्या ॲड. सायली दुभाषी ४८४ मतांनी विजयी झाल्या. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक देवेंद्र टेमकर ४४० मतांसह निवडून आले. प्रभाग ५ मध्ये भाजपच्या दुलारी रांगणेकर ६३६ मतांसह निवडून आल्या. तर भाजपचे माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर ५७९ मत घेत विजय खेचून आणला. अपक्ष उमेदवार बबलू मिशाळ यांनी तब्बल ४३१ मत प्राप्त केली. १४८ मतांनी श्री. आडीवरेकर यांनी त्यांचा पराभव केला. 

प्रभाग ६ मधून शिवसेनेच्या शर्वरी धारगळकर यांनी ४२४ मतांसह विजय प्राप्त केला. तर शिवसेनेचे दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी ५०७ मतांसह विजय प्राप्त केला. प्रभाग ७ मधून शिवसेनेच्या स्नेहा नाईक यांनी माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर यांचा ९१ मतांनी पराभव केला. माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ८२६ मत घेत तब्बल ४८१ मतांचं मताधिक्य घेऊन भाजपचे माजी नगरसेवक उदय नाईक यांचा दारूण पराभव केला. प्रभाग ८ मधून माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांचा पराभव करत भाजपच्या सुकन्या टोपले १८२ च्या मताधिक्याने विजयी झाल्या. तर माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांचा भाजपचे प्रतिक बांदेकर यांनी ६५६ मत घेत पराभव केला. प्रभाग ९ मधून भाजपच्या निलम नाईक यांनी ५७२ मत घेत विजय प्राप्त केला. तर ६१४ मतांसह शिवसेनेचे अजय गोंदावळे निवडून आले. प्रभाग १० मधून भाजपच्या वीणा जाधव ९१० मतांसह ४७९ एवढं मताधिक्य घेतलं. तर भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर ९५९ मत घेत सर्वाधिक तब्बल ६१८ मतांचं मताधिक्य घेत मोठा विजय खेचून आणला.

या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, राजू बेग, दिपाली सावंत, सुरेश भोगटे, उत्कर्षा सासोलकर, उमेश कोरगावकर, क्षिप्रा सावंत, गोविंद वाडकर यांना पराभव सहन करावा लागला. तर १३ नवीन चेहऱ्यांना सावंतवाडीकरांना पसंती दर्शविली. ७ जुने चेहरे नगरपरिषदेत पुन्हा एकदा जिंकून गेलेत. भाजपला ११ जागांवर विजय मिळाल्याने माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांना होमपीचवर मोठा धक्का बसला. पोटनिवडणुकीनंतर भाजपने युवराज्ञींच्या रुपान पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी आपला दबदबा कायम राखला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंना या विजयाचे श्रेय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिल आहे. तर शिवसेना उमेदवारांनी विजयाच श्रेय माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, आम. निलेश राणेंना दिलं आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संजू परब तर भाजपकडून युवा नेते विशाल परब गेमचेंजर ठरले.