
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या ओरोस येथील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर ऑफिस), पोलीस अधीक्षक कार्यालय (एसपी ऑफिस) आणि जिल्हा रुग्णालय यांसारख्या अतिमहत्त्वाच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या मार्गाची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने सामान्य नागरिकांना दररोज मोठा मनस्ताप आणि हाल सोसावे लागत आहेत.
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचा दिखावा संबंधित ठेकेदारांकडून केला जात आहे. मात्र, खड्ड्यांमध्ये केवळ खडी ओतून ठेवल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या खड्ड्यांची भरणी करण्यात आली आहे, त्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या जागी आता खडीऐवजी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या सुट्या खडीवरून आणि धुळीवरून दुचाकी स्लीप होऊन मोठे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सामान्य नागरिकांच्या रस्त्यांची ही अवस्था असतानाच, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांसमोरील (बंगल्यांसमोरील) रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या नाकाखाली ही परिस्थिती असूनही याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या धोकादायक रस्त्यावरून रुग्णालयात जाणारे रुग्ण, शालेय विद्यार्थी आणि कामानिमित्त येणारे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. "प्रशासन आणि संबंधित ठेकेदार एखाद्याचा बळी गेल्यानंतरच जागे होणार का?" असा संतप्त सवाल आता ओरोसवासीय आणि जिल्ह्यातील सामान्य जनतेतून विचारला जात आहे. या रस्त्याचे तातडीने दर्जेदार डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








