
कुडाळ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात विकासकामांवरून राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, राकेश नेमळेकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. दहा वर्षे सत्ता आणि अधिकार असताना मतदारसंघाचा कायापालट का केला नाही, असा थेट प्रश्न करत त्यांनी नाईकांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.
आमदारकीच्या काळात जनतेची कामे केली असती आणि विकासाला गती दिली असती, तर जनतेने नाकारले नसते. पराभवानंतर अचानक प्रत्येक प्रश्नाची आणि कामाची आठवण होणे हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नेमळेकरांनी केला.
एखाद्या कामाची सुरुवात झाली म्हणून त्याचे संपूर्ण श्रेय घेता येत नाही. निधी, प्रशासकीय मान्यता, निविदा, वर्क ऑर्डर आणि प्रत्यक्षात काम पुढे कोणी नेले, हे कागदपत्रांसह जनतेसमोर ठेवावे, असे थेट आव्हान त्यांनी माजी आमदारांना दिले आहे.
सध्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रखडलेल्या कामांना गती मिळत असून नवीन विकासकामांसाठी पाठपुरावा सुरू आहे. अशा वेळी प्रत्येक गोष्टीत खो घालण्याऐवजी सकारात्मक राजकारण करावे, असा सल्ला माजी आमदार यांना नेमळेकरांनी दिला आहे.
लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार असला तरी ती तथ्यांवर आधारित असावी. निलेश राणे यांच्यावर यापुढे खोटे आरोप किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, असा इशारा नेमळेकरांनी दिला.
आता जनता पोस्टर किंवा आरोपांवर नाही, तर प्रत्यक्षात काम कोण करून दाखवत आहे हे पाहत असून, विरोधकांनी दुसऱ्यांच्या कामांवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाला पहावे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. आता कुडाळ मालवण राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.










