
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील विवाहिता आत्महत्या प्रकरणी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील माजी नगराध्यक्षा प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना जिल्हा न्यायालयात अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलींद आनंदराव माने (४८, रा. देवगड) याला सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीसाठी मिलिंद माने याला रात्री उशिरा ताब्यात घेतले. मात्र त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
मयत प्रिया चव्हाण यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमधील बंद खोलीत ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रियाच्या आई-वडिलांनी आक्षेप घेत तिच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी सखोल तपास करून संशयित प्रणाली माने आणि तिचा मुलगा आर्य माने या दोघांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांना जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर झाला. यानंतर आता प्रणालीच्या पतीला याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी तशी मागणी केली होती.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.