LIVE UPDATES

दुचाकींना २००, चारचाकींना १ हजारचेच पेट्रोल

सावंतवाडीतील काही पंपावर युद्धाची झळ
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2026 20:37 PM
views 32  views

सावंतवाडी : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट फटका आता स्थानिक पातळीवर बसू लागला असून सावंतवाडी शहरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही पेट्रोल पंपांवर इंधनाची काटकसर सुरू करण्यात आली असून वाहनधारकांना मर्यादित स्वरूपात इंधन दिले जात आहे.

इंधनाचा साठा मर्यादित असल्याने प्रशासकीय स्तरावर किंवा पंप चालकांकडून काटकसरीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार सध्या दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांचे, तर चारचाकी वाहनांना केवळ १००० रुपये किमतीचेच पेट्रोल देण्यात येत आहे. अचानक लागू झालेल्या या नियमांमुळे वाहनधारकांमध्ये काहीसा गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील विस्कळीत पुरवठ्यामुळे देशात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन आणि एलपीजी गॅसचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

एकीकडे सातत्याने होणारी दरवाढ आणि दुसरीकडे आता सुरू झालेली इंधन कपात, यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. इंधनाचा हा तुटवडा पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.