LIVE UPDATES

महागाईविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा

पंतप्रधानांच्या जुन्या भाषणाची ऑडिओ क्लिप वाजवून निषेध
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 27, 2026 12:49 PM
views 222  views

कुडाळ : "सखी सैय्या तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है..." या प्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी आणि केंद्रातील मोदी सरकारच्या जुन्या भाषणांच्या ऑडिओ क्लिपने आज कुडाळ शहराचा परिसर चांगलाच गाजला. वाढत्या महागाईच्या आणि सरकारच्या पोकळ आश्वासनांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये एक अनोखा आणि आक्रमक मोर्चा काढण्यात आला.

कुडाळ येथील जिजामाता चौक ते कुडाळ बसस्थानक दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

पंतप्रधानांच्या जुन्या भाषणाने कोंडी

या आंदोलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांची वाजवली गेलेली ऑडिओ क्लिप! “पेट्रोल के दाम कम हुए की नही हुए? डिझेल के दाम कम हुए की नही हुए? महंगाई कम हुई की नही हुई?” या पंतप्रधानांच्याच जुन्या प्रश्नांचा पाढा ऐकवत शिवसैनिकांनी सरकारवर जोरदार कडाडून टीका केली. एका बाजूला महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर तीव्र शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले,

"आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव सातत्याने वाढत असून रुपयाचा दर घसरत चालला आहे. पंतप्रधान डॉलरची ही घोडदौड आणि रुपयाची घसरण थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून सर्वसामान्यांना इंधन मिळणे कठीण झाले आहे."

पुढे बोलताना नाईक यांनी आगामी शेती हंगामाबाबत चिंता व्यक्त केली. "शेतकऱ्यांचा हंगाम तोंडावर आला आहे. शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची अत्यंत गरज भासणार आहे, अशा अवस्थेत इंधनच उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. महागाईसोबतच सध्या गाजत असलेल्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपरफुटीचा विषयही त्यांनी लावून धरला. या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या वाढत्या महागाईवर आता सरकार कसे आणि कधी नियंत्रण मिळवणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. या धडक मोर्चामध्ये खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख, माजी आमदार), परशुराम उपरकर (माजी आमदार), अमरसेन सावंत (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), मंदार शिरसाट (युवा सेना जिल्हाप्रमुख), कृष्णा धुरी (तालुका प्रमुख), संतोष शिरसाट, संतोष कांदळकर, अतुल बंगे (माजी पंचायत समिती सदस्य), योगेश धुरी (युवासेना तालुका प्रमुख), अर्चना बंगे (पंचायत समिती सदस्य), ममता राऊळ, बबन बोभाटे, गुरु सडेकर, अमित राणे आदी उपस्थित होते.