
निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या 'मार्गदर्शनात' केली हिंमत ?
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरानजीक असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एका गावात देवस्थान कमिटीचा अध्यक्ष इतर गावकऱ्यांच्या नकळत फंडपेटी फोडत असताना त्याच मंदिरातील पुजाऱ्याने त्याला रंगेहात पकडले. अनेक दिवस कोणीतरी फंडपेटी उघडत असल्याचा संशय असलेल्या त्या पुजाऱ्याने तात्काळ इतर गावकऱ्यांना बोलावून आणून हे प्रकरण त्यांच्या समोर ठेवले. मात्र गावची बदनामी नको या कारणामुळे हे प्रकरण सध्या दाबण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र श्रद्धेने गोर गरीब भाविकांनी दान केलेले पैसे असे जर हे मंदिराचे व्यवस्थापक स्वतःची घरे भरण्यास वापरत असतील तर त्या गावातील ग्रामस्थांनी याबाबत उठाव करणे गरजेचे आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले शहरानजीकचे एक "ऐतिहासिक वारसा" लाभलेले छोटस निसर्गसंपन्न गाव. या गावात नुकतेच १ महिन्यांपूर्वी देवस्थानचे काही धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या गावातील एका मंदिरातील पुजाऱ्याला संशय होता की, कोणीतरी देवळातील फंडपेटी उघडत आहे. म्हणून त्या पुजाऱ्याने फंडपेटीच्या चावीच्या छिद्राला चुना लावून ते छिद्र बंद केले. मात्र काही दिवसांनी पुन्हा ती फंडपेटी उघडल्याचे त्या पुजाऱ्याच्या लक्षात आले. "आपण मंदिरातील पुजारी आहे. उद्या जर सर्व गावकऱ्यांनी फंडपेटी उघडली व त्यात कमी पैसे मिळाले तर हे प्रकरण नाहक आपल्यावर येऊ शकते" असा विचार करून त्याने फंडपेटी उघडणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडायचे ठरवले.
गावातील त्या प्रमुख मंदिरात एक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व गावकरी, मानकरी तरंग देवता घेऊन मंदिरातून निघाले. तो पुजारी मागे साफसफाई करण्यासाठी थांबला. मात्र त्याचवेळी मंदिरात कोणी नसल्याची संधी साधत त्या गावातील देवस्थान कमिटीच्या अध्यक्षाने मंदिरात येऊन फंडपेटी उघडून त्यातील पैसे काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याठिकाणी मंदिराच्या बाजूला असलेल्या पुजाऱ्याने येत त्या अध्यक्षाला रंगेहात पकडले. आणि नुकतेच मंदिरातून गेलेल्या इतर गावकऱ्यांना मंदिरात पाचारण केले. व घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.
याबाबत त्याच गावातील काही गावकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावाची बदनामी नको म्हणून हे प्रकरण त्याच ठिकाणी मिटवण्यात आले. मात्र याच गावातील काही गावकरी या प्रकरणाच्या मुळाशी जात असून त्यांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. लवकरच ते याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र या अध्यक्षाच्या मागे नेमकी कोण व्यक्ती आहे जी त्याला अभय देत आहे. एक "निवृत्त शासकीय कर्मचारी व त्याच देवस्थान कमिटीत असलेल्या सदस्याच्या" सांगण्यावरून किंवा त्याच्या मार्गदर्शखाली हा अध्यक्ष वावरत असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील गोर गरीब जनतेने, व इतर भाविकांनी श्रद्धेने मंदिराच्या फंडपेटीत केलेले दान जर अशाप्रकारे वापरले जात असेल तर ही बाब गावच्या प्रतिष्ठेसाठी बाधक ठरू शकते. सध्या या प्रकरणाची गावात जोरदार चर्चा सुरू आहे.











