
दोडामार्ग : दोडामार्गात नवीन फ्लॅटचे ओपनिंग करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या आजीला नातवंडांना घेऊन नदीवर आंघोळीसाठी जाण्याचा मोह एका नातवाच्या जिवावर बेतला. कुडासे वानोशी येथे आंघोळीसाठी तिलारी नदीपात्रात उतरलेल्या दोघा नातवांपैकी वेदांत सचिन सांगेलकर ( वय - १३) रा.मुंबई दादर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वा.च्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले खरे मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी जाहीर केले.
याबाबत अधिक माहिती अशी, मूळ सोनावल येथील कल्पना रविंद्र पाडलोस्कर या आपल्या मुलीचा मुलगा रुत्व दक्षत पाटील ( वय - ०८) , व्रीश पाटील व भावाचा नातू वेदांत सांगेलकर ( वय - १३) यांना घेऊन दोडामार्ग येथे नव्याने खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये पूजा करण्यासाठी मुंबई येथून आल्या होत्या. काही दिवसांनी पूजा करण्याचा बेत होता.त्यामुळे अन्य नातेवाईक मंडळी पुढील दोन दिवसात येणार होती. मंगळवारी या नातवानी आजीकडे नदीवर आंघोळी ला जाण्याचा हट्ट धरला. आजीलाही आंघोळीचा मोह झाला. त्यासाठी त्यांनी कुडासे वानोशी येथील तिलारी नदीपात्राचे ठिकाण निवडले. संध्याकाळी ४ च्या दरम्यान ते चौघेही घटनास्थळी दाखल झाले.यावेळी इतरही काही लोक त्याठिकाणी आंघोळ करीत होते. सर्वप्रथम मोठा नातू व्रीश व वेदांत पाण्यात उतरले व आंघोळीचा आनंद घेऊ लागले.
यादरम्यान व्रीश काठावर उभ्या असलेली आजी कल्पना व भाऊ रुत्व याला आणण्यासाठी काठावर गेला. यादरम्यान खोल पाण्यात जाण्याचा मोह वेदांतला झाला. आजी कल्पनाने पुढे न जाण्यासाठी वेदांतला आवाज दिला पण तिचे न ऐकता पुढे जाण्याचा झालेला मोह वेदांतला आवरता आला नाही. या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला. वाचविण्यासाठी आरडाओरडा करताच स्थानिकांनी त्याला बाहेर काढले. आणि लागलीच साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी जाहीर केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे आपल्या टीमसह रुग्णालयात दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
ज्याठिकाणी वेदांतचा बुडून मृत्यू झाला त्याठिकाणी यापूर्वीही अशी दुर्घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. याचठिकाणी आंघोळ करताना पाण्यात बुडून मामा - भाचीचा मृत्यू झाला होता. वेदांतच्या मृत्यूने दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली अन आठवणी ताज्या झाल्या.










