LIVE UPDATES

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या सेवेला मुदतवाढ देण्याची मागणी

मंगेश तळवणेकरांनी वेधलं आरोग्यमंत्र्यांचं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2026 21:41 PM
views 25  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक, स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ते म्हणाले, सन १९९६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉ. ऐवळे यांनी रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केली असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी दोन वेळा उत्कृष्ट सेवा बजावली आहे. दरम्यान, नवीन एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना एका वर्षाच्या बाँण्डवर स्त्रीरोगतज्ञ म्हणून नेमले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अनुभवी डॉक्टरांची आवश्यकता लक्षात घेता डॉ. ऐवाळे यांनाच मुदतवाढ द्यावी, अशी जनतेची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

यापूर्वी कोविड काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रयत्नातून मुदतवाढ मिळाली होती. त्याच धर्तीवर डॉ. ऐवाळे यांनाही विशेष बाब म्हणून मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी मागणी मंगेश तळवणकर यांनी ९ मे २०२६ रोजी पत्राद्वारे केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी सर्वाधिक असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे अनुभवी स्त्रीरोगतज्ञ म्हणून डॉ. ऐवाळे यांची सेवा कायम ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.