LIVE UPDATES

मालवण शहरात स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र सुरू होण्याचा मार्ग सुकर

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 18:31 PM
views 22  views

​मालवण : तळागाळातील सामान्य जनतेच्या समस्या व अडचणी थेट मंत्रालय पातळीवरून त्वरित सोडवण्याच्या उद्देशाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभरात 'सेवा अभियान' सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी येथे करण्यात आला. या अभियानाअंतर्गत सादर करण्यात आलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात आली असून, मालवण शहरात स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र स्थापन करण्यास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सावंतवाडी येथे आयोजित सेवा अभियानादरम्यान 'श्री स्वराज्य सक्षम सेवा प्रतिष्ठान मालवण'च्या अध्यक्षा शिल्पा यतीन खोत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नावे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सोपवले. बदलती सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती, विभक्त कुटुंब पद्धती आणि सोशल मीडियाच्या परिणामांमुळे मालवण शहर व तालुक्यात कौटुंबिक हिंसाचार व वादाचे प्रमाण वाढत आहे. अशा समस्याग्रस्त महिलांना समुपदेशनासाठी सध्या कुडाळ किंवा कणकवली येथे जावे लागते, ज्यामुळे अनेकांना आर्थिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही वस्तुस्थिती निवेदनाद्वारे मांडण्यात आली होती.

सावंतवाडी येथील अभियानात हे निवेदन प्राप्त होताच उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधला. मंत्री तटकरे यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत मालवण शहरासाठी स्वतंत्र महिला समुपदेशन केंद्र मंजूर करण्याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे या मागणीच्या पाठपुराव्याला लवकरच यश मिळून मालवणात केंद्र सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

जनतेच्या समस्या थेट शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तात्काळ मार्ग काढणाऱ्या या 'सेवा अभियाना'बद्दल आणि मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सौ. शिल्पा खोत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहेत.