
कुडाळ: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळमधील लहान मुलांमध्ये कॅरम व बुद्धिबळ खेळांची आवड निर्माण करण्यासाठी मराठा समाज हॉलमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला मुलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात कुडाळ शहर, तालुका तसेच कणकवली येथील ५ वर्षां पुढील तब्बल १२४ मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून खेळाचे प्राथमिक धडे गिरवले. मुक्ताई ॲकेडमीतर्फे कुडाळ येथे पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे शिबीर घेण्यात आले होते.
या शिबिराचे शानदार उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, रामचंद्र परब , संवाद मीडिया न्यूज चॅनेलच्या ब्युरो चीफ विभावरी पालव, सीए वालावलकर मॅडम, केंद्र प्रमुख वारंग सर, कोकण नाऊ न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी निलेश जोशी, उन्मेष शेट्ये, गुरुप्रसाद सावंत , अनंत राणे , श्री .आगलावे , बुद्धिबळ मार्गदर्शक मयुरेश मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी उपस्थित राहणे शक्य नसल्याने फोनवरून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर विभावरी पालव यांनीही आपल्या मनोगतातून शिबिराला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.उद्घाटनपर सत्रात मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी संस्थेच्या गेल्या १० वर्षांतील दैदिप्यमान वाटचालीचा परिचय करून दिला. ॲकेडमीचे विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरले असून, तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ खेळात आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सलग तीन वर्षे "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार मिळवणारी ही कोकणातील एकमेव संस्था असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.उद्घाटनपर भाषणात बोलताना काका कुडाळकर यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या या उपक्रमाचे आणि अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. पालकांनी आपल्या मुलांमधील खेळाची आवड ओळखून त्यांना योग्य प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना त्यांनी, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांनी तब्बल २७ वर्षे असोसिएशन आणि कॅरम खेळासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. कौस्तुभ आणि बाळकृष्ण हा वारसा पुढे समर्थपणे चालवत असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. मुक्ताई ॲकेडमीने आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कॅरम चँपियन आणि बुद्धिबळ ग्रँडमास्टर घडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत ॲकेडमीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.ॲकेडमीचे विद्यार्थी, सावंतवाडीचे बाळकृष्ण पेडणेकर आणि मालवणचे मयुरेश मालवणकर हे मागील महिन्यात जिल्ह्यातील पहिले, 'महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोसिएशन'चे राज्य पंच बनले आहेत. या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून काका कुडाळकर यांच्या हस्ते मयुरेश मालवणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या शिबिरात कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम खेळातील विविध बारकावे आणि कौशल्ये शिकवली, तर मयुरेश मालवणकर यांनी बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक तंत्र व डावपेच याचे उत्तम प्रशिक्षण दिले. याशिवाय ॲकेडमी, शालेय स्तर आणि असोसिएशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, त्यामधून मिळणारे गुण (रेटिंग) आणि खेळाडूंना होणारे फायदे याविषयी शिबिरात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभारप्रदर्शन समीर राऊळ सरांनी केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी मुक्ताई ॲकेडमीच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.











