LIVE UPDATES

आपल्यासमोर येणाऱ्याला रिकाम्या हाताने पाठवू नका

पालकमंत्री नितेश राणे : महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 15:45 PM
views 149  views

सिंधुदुर्गनगरी : जनतेशी थेट संबंध असलेला महसूल विभाग हा शासनाचा कणा असून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत रिकाम्या हाताने परत पाठवू नका. लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा. अधिकाऱ्यांच्या शब्दकोशात 'नाही' हा शब्द नसावा. प्रकरणे प्रलंबित न ठेवता तत्परतेने निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महसूल दिनानिमित्त कार्यकमत बोलताना दिले.

महसूल दिन शनिवारी (१ ऑगस्ट) येथील मायनाक भंडारी सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, बांधकाम सभापती संतोष साटविलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पालकमंत्री राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून महसूल दिनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महसूल विभागाने स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक प्रशासनापर्यंत लोकाभिमुख शासनव्यवस्थेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगितले. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी विभाग सातत्याने कार्यरत असून उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर सन २०२५-२६ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल निवड झालेल्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच दिव्यांग पालकत्व प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी महसूल विभागामार्फत गतिमान व पारदर्शक प्रशासन सुरू असून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळत असल्याचे सांगितले. 'महाराजस्व' अभियानातून नागरिकांना विविध दाखले वेळेत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महसूल विभागाचे अभिनंदन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, महसूल विभागाचा जिल्ह्याच्या विकासात मोठा वाटा आहे. मुख्य खुर्चीवर बसलेला अधिकारी जितका महत्त्वाचा असतो, तितकाच कारकूनही महत्त्वाचा असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे आज त्यांचा होत असलेला सन्मान हा त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. जनतेच्या कामांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन प्रकरणे प्रलंबित न ठेवता वेळेत निकाली काढावीत, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागस्तरावरील गौरवासाठी निवड होणे ही सिंधुदुर्गसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी जिल्हा आणि नागरिकांच्या हिताचे सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सावंत यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी आभार मानले.