LIVE UPDATES

शास्त्रीय संगीत संवर्धनात आचरेकर प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान : पं. समीर दुबळे

आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा : गेली २० वर्षे शास्त्रीय संगीत प्रशिक्षणाची परंपरा कायम...!
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 16:23 PM
views 27  views

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही नाट्य क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. सिंधुदुर्गातील नाट्य चळवळीत या संस्थेचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. प्रतिष्ठान व पं. जितेंद्र अभिषेकी सघन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गेली शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्याना गेली वीस वर्षे शास्त्रीय संगीत प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. याचे सर्व श्रेय वसंतराव आचरेकर संस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी व संगीतप्रेमींना जाते, असे प्रतिपादन पंडित समीर दुबळे यांनी केले. 

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान व पंडित जितेंद्र अभिषेकी सघन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या शुभारंभप्रसंगी श्री. दुबळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राकेश जोशी, पूजा जोशी, तबलावादक चारुदत्त फडके, संस्थेचे कार्यध्यक्ष अ‍ॅड. एन.आर.देसाई, विश्वस्त डॉ. समीर नवरे, दामोदर सावंत, सहकार्यवाह सीमा कोरगावकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. निलेश कोदे, लीना काळसेकर, राजा राजाध्यक्ष, राकेश काणेकर, मनोज मेस्त्री, सोनाली कोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


श्री. दुबळे म्हणाले, शास्त्रीय संगीत ही कला आहे. ही कला अवगत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही कला अवगत केल्यानंतर संगीताचा नियमित रियाज करावा लागतो. कणकवली ही सांस्कृतिक नगरी आहे. या नगरीतील नागरिक नाट्य व संगीतप्रेमी आहेत. शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्याना ही कला अवगत करता यावी यासाठी गेली कित्येक वर्षे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान व पं. जितेंद्र अभिषेकी सघन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी याठिकाणी शास्त्रीय संगीताचे धडे दिले जात आहेत. ही कला अवगत करण्यासाठी तरुण-तरुणी स्वत:हून शास्त्रीय संगीताचे धडे प्रशिक्षणातून घेत आहे, ही बाब कौतुकास्पद अशी आहे. आरंभी गुरुपौर्णिमा उत्सवाचे उद्घाटन पं. समीर दुबळे, चारुदत्त फडके, राकेश जोशी, पूजा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. मान्यवरांचे स्वागत अ‍ॅड. एन. आर. देसाई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. निलेश कोदे यांनी केले. यावेळी पं. जितेंद्र अभिषेकी सघन केंद्रचे विद्यार्थी संगीप्रेमी उपस्थित होते.