
दोडामार्ग : मांगेली येथील रस्त्याचे कुचकामी व अपूर्ण काम मोऱ्यांचे काम करण्याआधी करण्यात येणारे रस्त्याचे काम, व तालुक्यातील कृषी विभागाच्या मनमानी कारभारावर पंचायत समितीची मासिक सभा तापली. उपसभापती गणेश प्रसाद गवस व सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत अपूर्ण कामे पावसाळ्या आधी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांच्या सोबत उपसभापती गणेश प्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सोनिया कुबल, सायली निंबाळकर उपगटविकास अधिकारी यशवंत गवस व सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अनधिकृत फार्म हाऊस आहेत. त्याची चौकशी कारवाई करावी अशी एका सदस्यांने मागणी केली आहे. तर मांगेली येथे सुरु असलेल्या रस्ता काम कुचकामी पद्धतीने करण्यात येत असल्याचा आरोप सदस्य संजय सातार्डेकर यांनी करत ठेकेदाराला पाठीशी घालू नको, मोऱ्यांचे काम करण्याआधी रस्त्याचे काम कसे काय करण्यात आले आहे ? आता रस्त्याचे केलेले काम परत फोडून आता मोऱ्यांचे कामा करणार काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले.
तालुक्यातील कृषी विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या आत्मा समितीची बैठक कधी घेणार इतर तालुक्याची बैठक झाली पेपरला बातमी पण आली आणि तुम्ही काय करताय? असा प्रश्न गवस यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी कृषी अधिकारी म्हणाले की इतर तालुक्यात कुठेही बैठक झाली असे म्हणता क्षणी तुम्हाला बातमी दाखवू काय किंवा तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून विचारा असा मनमानी कारभार चालणार नाही आणि कुठलीही बैठक घ्यायची असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात निवेदन पाठवा. मोबाईलवर व्हाट्सअप वैगरे चालणार नाही. सगळेच जण काय मोबाईल बघतात याच्यातला भाग नाही. पावसाळा तोंडावर आला आणि तुमच्या ऑफिसला येऊन पडलेले बियाणे कधी वाटप करणार ? कृषी विभागाची खूप मनमानी चालली आहे, ती आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. तात्काळ कामाला लागा असे आदेश यावेळी गवस यांनी दिले.
वीज वितरणच्या कामावर सदस्य स्नेहा गवस आक्रमक
सभेत वीज वितरणचा विषय घेतल्यावर सदस्य स्नेहा गवस आक्रमक झाल्या. पावसाळा आला अद्याप पर्यंत विद्युत लाईनवरच्या झाडी कट केल्या नाहीत. ऐन पावसाळ्यात आम्हा जनतेला याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला आम्हाला तोंड द्यावे लागते. तुमचे नेमलेले लाईनमन कधीच फोन उचलत नाही अशा प्रकारे विज वितरणचा चाललेला भोंगळ कारभार आम्ही गप्प बसणार नाही अशा प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी विज वितरणचा पाढाच वाचला.
आपत्ती व्यवस्थापनेची कामे तात्काळ हाती घ्या
दरम्यान उपसभापती बोलताना म्हणाले की तिलारी नदीमुळे अनेक ठिकाणी पूर येतो. नदीकाठच्या गावात काही ठिकाणी सायरन बसविण्यात आलेले आहे. ते सायरन चालू करा. तसेच नदी काठी काही गावात पर्यटक मजा करण्यासाठी येतात आणि त्यांचा त्याठिकाणी जीव जातो अशा ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत फलक लावून धोका टाळा अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.











