
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पारंपरिक जुगार आणि मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांकडून कारवाई होत असल्याने आता काही जणांनी ऑनलाइन गेमिंग आणि ऑनलाइन मटक्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र समोर येत आहे. या ऑनलाइन प्रकारांच्या आहारी जाऊन आर्थिक नुकसान आणि मानसिक तणावाला सामोरे जाणाऱ्या तरुणांच्या समस्येची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठका घेतल्या त्यानंतर ते कोकणसादशी बोलत होते.
ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तरुण मोठ्या प्रमाणात पैसे गमावत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक तणावामुळे काही तरुण निराशेच्या गर्तेत जात असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग तसेच ऑनलाइन मटका यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने समन्वयाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातशेतीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याअभावी भाताची पिके करपू लागली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीचा अहवाल प्राप्त झाला असून, शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
ऑनलाइन गेमिंगचा वाढता धोका आणि पावसाअभावी निर्माण झालेली शेतीची समस्या या दोन्ही गंभीर विषयांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.










