LIVE UPDATES

उमलत्या वयातील प्रश्नांना 'मैत्री'चा आधार

दीड वर्षात ८ हजार ४३४ मुलांचे समुपदेशन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 06, 2026 12:39 PM
views 12  views

सिंधुदुर्गनगरी : किशोरावस्था म्हणजे शारीरिक बदलांसोबतच भावनिक आणि मानसिक उलथापालथीचा काळ. या वयातील अनेक प्रश्न मुलांना पालकांशी किंवा शिक्षकांशी मोकळेपणाने बोलता येत नाहीत. अशा संवेदनशील प्रश्नांना शास्त्रीय माहिती, समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'मैत्री केंद्रे' कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ४ केंद्रांमधून गेल्या दीड वर्षात सुमारे ८ हजार ४३४ किशोरवयीन मुला-मुलींना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात ३,८८९ मुलांचा तर ४,५४५ मुलींचा समावेश आहे.

शारीरिक, भावनिक बदलांचा काळ

पौगंडावस्थेत शरीरातील हार्मोनल बदलांमुळे उंची-वजनात बदल, लैंगिक परिपक्वता, मासिक पाळी, आवाजातील बदल यांसह भावनिक चढ-उतार जाणवतात. या बदलांविषयी योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे

काय आहे 'मैत्री केंद्र'?

किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्य विषयक माहिती, समुपदेशन आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, यासाठी सुरू केलेले हे विशेष केंद्र आहे. येथे मुलांना मोकळेपणाने प्रश्न विचारण्याची सुविधा असते. जिल्ह्यात ४ मैत्री केंद्रे कार्यरत असून, गेल्या दीड वर्षात सुमारे ८ हजार ४३४ मुला-मुलींना समुपदेशनाचा लाभ मिळाला आहे. यात सन २०२५-२६ मध्ये ७,०३० तर एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ पर्यंत १,४०४ मुला मुलींचे समुपदेशन करण्यात आले आहे.

या विषयांवर मार्गदर्शन ?

योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी व्यवस्थापन, अभ्यासाचा ताण, मैत्री व नातेसंबंध, व्यसनमुक्ती, लैंगिक आरोग्य तसेच विवाहपूर्व मार्गदर्शन यांवर शास्त्रीय माहिती देतात.

किशोरवयीन मुलांनी मांडलेले वैयक्तिक प्रश्न आणि समुपदेशनाची माहिती गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे मुलांना संकोच न बाळगता समस्या मांडता येतात. वैद्यकीय तपासणी केली जाते. आवश्यक असल्यास पुढील उपचारांसाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भदिला जातो. मोबाइलचा अति वापर, सोशल मीडिया यातून होणारा मानसिक ताण यावर समुपदेशन केले जाते.

कुठे आहेत मैत्री केंद्रे ?

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, ग्रामीण रुग्णालय मालवण या चार आरोग्य संस्थांमध्ये ही केंद्रे कार्यरत आहेत. किशोरावस्था हा शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा संवेदनशील टप्पा आहे. या काळातील प्रश्न लपवण्यापेक्षा योग्य व्यक्तीशी संवाद साधणे गरजेचे आहे. 'मैत्री केंद्रा'त शास्त्रीय माहिती व समुपदेशन मिळते. पालकांनी मुलांशी संवाद साधावा.

- डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग.