
सिंधुदुर्ग : कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेले अतोनात नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, राज्यभर एल-निनोच्या सावटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर, यंदा दि. २३ जून रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. तर गो-सेवा करण्याचे आवाहन देखील कार्यकर्त्यांना केले आहे.
ते म्हणाले, अशा कठीण काळात आनंदोत्सवापेक्षा उद्भवलेल्या परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझ्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की, प्रत्यक्ष भेटायला न येता आपापल्या जिल्ह्यात 'गो-सेवा' करावी व विविध समाजपयोगी उपक्रम राबवावेत. हिंदुत्वाच्या संस्कारातून गौमातेची सेवा, गौसंवर्धनाच्या कार्यात सहभाग तसेच गरजूंना मदत आणि समाजहिताचे कार्य हेच खरे उत्सवाचे स्वरूप आहे. तुमचा हा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल अशी भावना व्यक्त केली आहे.










