LIVE UPDATES

LCB ची सर्वात मोठी कारवाई

९२ लाखांच्या खवले मांजराच्या खवल्यांसह चौघे जेरबंद
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 29, 2026 18:49 PM
views 251  views

सिंधुदुर्गनगरी : \स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत सुमारे ९२ लाख रुपये किमतीची दुर्मिळ खवले मांजराची (पँगोलिन) खवले, सांबराची शिंगे तसेच दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार २९ मे रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास सापळा रचून छापा टाकण्यात आला.

या कारवाईत १ किलो ८०० ग्रॅम वजनाची खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे तसेच दोन मोटारसायकली असा एकूण ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, ता. कुडाळ), विठोबा भगवान बावलेकर (रानबांबुळी), शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, रा. पडवे) आणि कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकळवाड, ता. मालवण) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम ९, ४४, ४९(ब), ५१ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड तसेच डॉमिनिक डिसोजा, राणे, जॅक्सन, कांडर व समजिस्कर यांचा सहभाग होता. वन्यजीवांच्या अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात जिल्ह्यातील ही अलीकडील काळातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.