LIVE UPDATES

विकास तलावाचा होणार की सत्ताधाऱ्यांचा ? : डॉ.‌ जयेंद्र परुळेकर

Edited by: विनायाक गांवस
Published on: May 29, 2026 20:05 PM
views 18  views

सावंतवाडी :  सावंतवाडीच्या मोती तलावाचा विकास" करणार, असे नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी म्हटले. मात्र, मोती तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खर्च करून त्याचे सुशोभीकरण करण्याचा हा प्रयत्न तलावाच्या ऐतिहासिक वारशाला आणि अस्तित्वाला मोठा धोका उत्पन्न करू शकतो. तसेच आजच्या जमान्यात नक्की विकास तलावाचा होणार की सत्ताधाऱ्यांचा ? असा जाहीर सवाल डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास निश्चितपणे झालाच पाहिजे, यात दुमत नाही. पण तो होत असताना शहराचे मूळ सौंदर्य विद्रुप होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 'तलाव सुशोभीकरण' ही प्रक्रियाच नेहमी संशयास्पद ठरत आलेली आहे. आजवर अनेक तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरणापर्यंत पोहोचले आहेत आणि कालांतराने तेच तलाव बुजवून तिथे इमारती, शॉपिंग मॉल, थिएटर उभी राहिलेली जनतेने पाहिली आहेत, अशी तीव्र भीती त्यांनी व्यक्त केली. मोती तलावाचा ऐतिहासिक वारसा खऱ्या अर्थाने जपायचा असेल तर जवळपास दोनशे वर्षे पूर्ण झालेल्या या तलावाला धामापूर येथील भगवती मंदिराशेजारील तलावाप्रमाणे "वर्ल्ड हेरिटेज वेटलँड" चे मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे जागतिक मानांकन मिळाल्यास सावंतवाडी शहराच्या पर्यटनाला खऱ्या अर्थाने आणि आपोआप जागतिक दर्जा प्राप्त होईल, असे डॉ. परुळेकर यांनी सुचवले आहे. सावंतवाडीचा पर्यटन विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी शहरात जास्तीत जास्त 'होम स्टे' सुरू व्हावेत यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांना आवश्यक ते आर्थिक पाठबळ द्यावे. तसेच सावंतवाडी शहराचा ऐतिहासिक वारसा आणि हे शहर एक "शांत लेक टाऊन" असल्याची प्रसिद्धी  महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली, तरी येथील पर्यटन खऱ्या अर्थाने बहरेल. त्यामुळे सावंतवाडीचा मुख्य सौंदर्य बिंदू असलेल्या मोती तलावाला सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुप करू नये, असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.