LIVE UPDATES

पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 29, 2026 20:00 PM
views 22  views

सिंधुदुर्गनगरी : मागील ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ८ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आल्याने आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आठवडाभरात जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किमतीत ३८ टक्के, तर डिझेलच्या किमतीत ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले होते, तरी पेट्रोल-डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यात आले होते. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर तुलनेने कमी असतानाही पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आसपास पोहोचले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून तब्बल ४३ लाख कोटी रुपये वसूल केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच नुकत्याच झालेल्या चार रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी काही तासांतच सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपयांची कमाई केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असून जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच क्षेत्रातील महागाई वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उत्पन्न स्थिर असताना खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपांवर इंधनटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची शेतीकामेही खोळंबली आहेत. ट्रॅक्टरसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध होत नसल्याने पेरणीपूर्व कामांवर परिणाम होत असून, याचा अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ दरवाढ मागे घेऊन पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबूलकर, सेवादल समन्वयक अजिंक्य गावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, बाळू मेस्त्री, प्रवीण वरुणकर, वि. के. सावंत, विद्या प्रसाद बांदेकर, महेश तेली, शांताराम नेवरेकर यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.