LIVE UPDATES

प्रस्ताव मंजूर पण केंद्राच्या मंजुरीचे काय ?

चिपीचा चार वर्षांचा वनवास सावंतवाडीच्याही वाट्याला येणार का ? | नाथ पै आणि दंडवतेच्या सन्मानाची अजूनही प्रतीक्षाच
Edited by:
Published on: May 29, 2026 20:19 PM
views 9  views

कुडाळ - निलेश जोशी :  २६ मे २०२६ हा दिवस संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय ठरला. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनन्स करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आता तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार निश्चितच कौतुकास पात्र आहे. 

क्रिकेट मध्ये करियर करण्यासाठी मधू दंडवते अहिल्यानगर (तेव्हाचे अहमदनगर) मधून मुंबईत आले होते हे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही.  क्रिकेट आणि भौतिकशास्त्र हे त्यांचे आवडते विषय.  या दोन्ही क्षेत्रांशी दंडवतेंचं आणखी एक रंजक नातं आहे, ते त्यांच्या दोन हुशार आणि कर्तबगार विद्यार्थ्यांमुळे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन हे दोघेही प्रा. मधु दंडवते यांचे विद्यार्थी. पुढे खासदार झाल्यावरही त्यांचं क्रिकेटचं प्रेम कमी झालं नाही.

प्रा. मधु दंडवते दोनवेळा केंद्रीय मंत्री होते. पहिल्यांदा मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री आणि दुसऱ्यांदा व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. रेल्वेमंत्री असताना त्यांची कारकीर्द गाजली, ती त्यांच्या निर्णयांनी. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरीब लोक सेकंड क्लासमधून आरामदायक प्रवास करू शकतात. कोकण रेल्वे हा त्यांच्या रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाचा निर्णय ठरला. कोकण रेल्वेचं स्वप्न अ. ब. वालावलकरांनी पाहिलं, मात्र ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. आपटा ते रोहा या मार्गाच्या कामास वाट मोकळी करून दिली. प्रा. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि कोकण रेल्वेचे पहिले एम.डी. इ. श्रीधरन यांच्यामुळे कोकण रेल्वेचं स्वप्न साकार झालं. 

अशा या कोकण रेल्वेच्या शिल्पकाराच्या यथोचित गौरव महाराष्ट्र शासनाने केला आहे. कोकण रेल्वे मार्गाला त्यांचे नाव द्यावे अशी सुद्धा मागणी काही जणांनी केली होती. त्याच बरोबर कोकण कन्या गाडीला मधू दंडवतेंचे नाव द्यावे अशी सुद्धा मागणी होती. खरंतर सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन २७ जून २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होत. तीन टप्प्याच्या कामासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पण दुसऱ्या टप्प्यात काम रखडलं. त्यातूनच सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना उभी राहिली. आंदोलन झाली. त्यातूनच सावंतवाडी टर्मिनसला मधू दंडवतेचं नाव देण्याची संकल्पना पुढे आली होती. 

थोर व्यक्तींची नावे असलेली राज्यातील रेल्वे स्थानके 

राज्यात अनेक रेल्वे स्थानक आहेत जी थोर व्यक्तींच्या नावाने ओळखली जातात. त्यामध्ये ​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) म्हणजे  पूर्वीचे 'व्हिक्टोरिया टर्मिनस' (VT). ​नाना जगन्नाथ शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस.  त्याच बरोबर ​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) कुर्ला.  ​प्रभादेवी म्हणजे पूर्वीचे 'एल्फिन्स्टन रोड' स्टेशन. हे नाव स्थानिक प्रभादेवी मंदिरावरून आणि देवीच्या नावावरून बदलण्यात आले.

मुंबई प्रमाणेच कोल्हापूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांनी कोल्हापूर संस्थानात रेल्वे सुरू करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. जेजुरी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रेल्वे स्टेशन' करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ स्टेशनला महाराष्ट्राचे माजी लोकनेते 'गोपीनाथराव मुंडे' यांचे नाव देण्यात आले आहे.  हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव नांदेड स्टेशनच्या परिसराला/टर्मिनसला जोडले गेले आहे. ​तसेच  सांगलीतील स्टेशनला महान स्वातंत्र्यसैनिक सांगोळी रायाण्णा यांचे नाव देण्यात आले आहे. ​ नागपूरमधील खापरी मेट्रो स्टेशनला भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे.  पुणे मेट्रोमधील पिंपरी भागातील स्टेशनला महाराष्ट्राचे लाडके संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव दिले आहे.

सावंतवाडी रोड स्टेशनला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस हे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. केंद्र सरकार त्यासाठी किती वेळ घेते त्यावरून निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार हे समजणार आहे. 

पण असा अजून एक सिंधुदुर्गच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला प्रस्ताव केंद्र सरकाकडे २०२२ पासून पडून आहे. त्याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. तो प्रस्ताव म्हणजे सिंधुदुर्ग-चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा प्रस्ताव. बॅरिस्टर नाथ पै हे दक्षिण कोकणातील एक ख्यातनाम स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदपटू होते.  ज्यांची भाषण ऐकण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू संसदेत मुद्दाम उपस्थित राहत असा असा हा अमोघ वाणी असलेला वक्ता. कोकण  रेल्वेच्या कल्पनेत आणि कोकणाच्या विकासात त्यांच मोलाचे योगदान होत. 

२०२१-२२ हे बॅरिस्टर नाथ पै यांच जन्मशताब्दी वर्ष (२५ सप्टेंबर १९२२ ते २५ सप्टेंबर २०२२) म्हणून साजरं करण्यात आलं होत.  त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चिपी विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी इथंलं ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणारी महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळ बैठक २७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली होती. बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. 

राज्याच्या मंत्रिमंडळाने आणि विधिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, विमानतळांचे नामकरण करण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारचा (नागरी विमानवाहतूक मंत्रालय) असल्याने हा प्रस्ताव रीतसर मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाचा चेंडू देखील गेली चार वर्षे केंद्रसरकाच्या कोर्टात आहे. चिपी विमानतळावरून जसं मुंबई फेरी सुरु होणार, अशा फक्त घोषणा होतात, पाठपुरावा होताना दिसत नाही त्याप्रमाणेच चिपी विमानतळाला  बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याविषयी सुद्धा कोणी पाठपुरावा केल्याचं कानी आलेलं नाहीये. 

अनेक विमानतळांना थोर व्यक्तींची नावे 

महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन्सप्रमाणेच अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांना देखील राज्याचा इतिहास, संस्कृती, स्वातंत्र्यलढा आणि आध्यात्मिक वारसा समृद्ध करणाऱ्या महान व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. मुंबईचे ​छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोल्हापूरचे ​छत्रपती राजाराम महाराज विमानतळ. नांदेडचे ​श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ. 

त्याचबरोबर काही विमानतळाच्या नामांतराला राज्य शासनाकडून मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामध्ये लोहगाव-​पुणे येथील संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. छात्रपती संभाजी नगरचे ​छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. नवी मुंबईचे ​लोकनेते डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. यांचा समावेश आहेत. 

या यादीतच आता सिंधुदुर्ग-चिपीच्या विमानतळाची भर पडली आहे. २७ सप्टेंबर २०२२ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. देशातील कोणत्याही विमानतळाच अधिकृत नामांतर करण्यासाठी राज्य सरकारने  मंजूर केलेला प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवावा लागतो. तिथे मंजुरी मिळाल्यानंतरच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून त्याचे अंतिम गॅझेट नोटिफिकेशन निघते. आज चार वर्ष होऊन गेली, पण अजूनतरी या विमानतळाचे नाव बदलून बॅरिस्टर नाथ पै विमानतळ झालेले नाही. या विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानाच्या तिकिटावरही म्हणजेच अधिकृत तिकीट बुकिंग प्रणाली मध्ये सुद्धा (DGCA/IATA कोड: SDW) या कोड सह  अजूनही हे 'सिंधुदुर्ग विमानतळ' म्हणूनच नोंदवले गेले आहे. केंद्राकडून अंतिम मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे असे म्हटले जाते. 

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला प्रा. मधू दंडवतेंचे नाव देणे असो व चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देणे असो, दोन्ही प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केले आहेत. एक प्रस्ताव चार दिवसांपूर्वी तर दुसरा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मंजूर झालाय. दोन्ही प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आणि केंद्रात एनडीएचे सरकार आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. तरी देखील चिपी विमानतळाच्या नामांतराला अजून मुहूर्त मिळत नाही मग सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नामांतराला तेवढीच वर्ष वाट पाहावी लागणार आहे का हा खरा प्रश्न कोकणवासियांच्या मनात आहे. 

म्हणूनच ​कोकणच्या आणि विशेषतः सिंधुदुर्गच्या दृष्टीने बॅरिस्टर नाथ पै असतील किंवा प्रा. मधू दंडवते असतील, या दोघांचेही  योगदान अमूल्य आहे. त्यामुळे  हे नामांतर पूर्ण होणे हा संपूर्ण सिंधुदुर्गसाठी अभिमानाचा क्षण असेल.