
सावंतवाडी : आजची परिस्थिती बघता भर पावसात जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना केलेली बरी. नुकतीच पालकमंत्री नितेश राणे यांनी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अधिकारी वर्गाला जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, वीजवितरण खात्याच्या अधिकारी वर्गाने या आदेशाला केराची टोपली दाखवली असून पालकमंत्र्यांनी याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी केली आहे.
तर दिवसभरात दहा ते पंधरा वेळा कोणतेही नैसर्गिक कारण नसताना वारंवार विज खंडित होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी उष्मा वाढलेला असून सूर्य आग ओकत असताना वीजवितरण खात्याचे अधिकारी सुशेगात असल्याप्रमाणे वागत आहेत. दिवस रात्र कोणतही कारण नसताना वारंवार विज खंडित होत असून यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योजक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. पावसाला अजून सुरूवात झालेली नाही त्यामुळे आतापासून जर ही अवस्था आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आता याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी किंव्हा दिवसभर सतत व विनाकारण खंडित होणाऱ्या वीजेच्या समस्येवर तरी ठोस उपाययोजना करावी असे आवाहन मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे.










