
सिंधुदुर्ग : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, ओरोस येथील महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडची दुरवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मागील कित्येक वर्षांपासून ओरोस महामार्गाचा हा सर्व्हिस रोड काही ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत असून, महामार्ग ठेकेदार कंपनी या गंभीर समस्येकडे साफ कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. ओरोस येथील जैतापकर कॉलनी परिसरातील सर्व्हिस रोडची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांत या रस्त्याखालची माती वाहून गेल्यामुळे रस्ता काही अंशतः खचला आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी आणि परिसरातील रहिवाशांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रस्ता खचल्यामुळे पावसाळ्यात तो आणखी खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याच्या दुरवस्थेसोबतच, पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या गटारांचे स्लॅबही अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. पावसाळ्यात या उघड्या पडलेल्या गटारांमुळे पादचाऱ्यांना, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, गटारे तुटल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहील आणि परिस्थिती अधिकच बिकट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरवर्षी पावसाळा जवळ आला की केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते, परंतु या समस्येवर कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही, असा संतप्त सवाल जैतापकर कॉलनीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महामार्ग प्राधिकरणाने आणि संबंधित ठेकेदाराने या कामांकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिक त्रस्त झाले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी या खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि तुटलेले गटारांचे स्लॅब नवीन बसवून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.











