LIVE UPDATES

'नीट' परीक्षा घोटाळ्या विरोधात कुडाळात विरोधी पक्षांच्यावतीने धरणे आंदोलन

शिक्षणमंत्री डॉ. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 20, 2026 19:00 PM
views 62  views

कुडाळ : नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करा, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि लोकशाही व संविधानिक अधिकारांचे संरक्षण करावे या मागण्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न, लोकशाहीचा प्रश्न आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आज कुडाळ तहसील कार्यालयामोर विरोधी पक्षांच्यावतीने जाहीर निषेध धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उबाठा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. 

या आंदोलनात ठाकरेसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस एसपीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे अभय शिरसाट, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी व ममता राऊळ, तसेच शिवाजी घोगळे, कृष्णा धुरी, साबा पाटकर, कुणाल किनळेकर, नासिर शेख, अशोक कांदे, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, संतोष शिरसाट, बाळ कनयाळकर, दिलीप चव्हाण, गणेश वाईरकर, जगन्नाथ गावडे, सागर जाधव, प्रथमेश धुरी, यतिन माजगावकर, संतोष गावडे, दिनार चव्हाण, सुशांत परब, अनिकेत गावडे, सागर मयेकर, अविनाश अणावकर, विजय लाड, परेश गावकर, अनुवास नाईक, सुभाष नाईक, शंकर नाईक, आधी चारही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नीट, जेईई, टीईटी परीक्षेच्या पेपर फुटी मुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.  तरी यास जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा द्यावा, तसेच मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर दिल्ली इथे सुरु असलेले आंदोलन दडपल्याबद्ल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. येथील तहसील कार्यालयासमोर उबाठा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मनसे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकार हाय हाय, विद्यार्थ्यांचे वाटोळे करणाऱ्या शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, 'केंद्रात नरेंद्र पेपर फोडेन्द्र, सोनम वांगचुक, अभिजित दिपके आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यात आल्या. 

त्यांनतर सर्व धरणे आंदोलक घोषणाबाजी करतच तहसीलदार कार्यालयात गेले. तिथे तहसीलदार सचिन पाटील यांनी कार्यालयाबाहेर येत निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे, नीट, जेईई व टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीमुळे संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेपर फुटीमुळे जवळजवळ देशातील २७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई न झाल्यामुळे व केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न दिल्यामुळे मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकार व दिल्ली पोलीस यांच्या माध्यमातून जंतर मंतर येथे दडपशाही चालू आहे. या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा. तसेच  या संपूर्ण घोटाळ्यातील जबाबदार असणारे शिक्षण मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा द्यावा व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी ह्या मागण्या आपल्या माध्यमातून केंद्र सरकार पर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.