
सावंतवाडी : विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचे कार्य अतिशय मोलाचे असते. हेच पवित्र कार्य सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २ मधील शिक्षक कित्येक वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. या प्रशालेने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक प्रगतीच्या जोरावर आज संपूर्ण जिल्ह्यात आपले नाव कमावले आहे, असे गौरवोद्गार पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी काढले. येथील शाळा नंबर २ च्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुधाताई वामनराव कामत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २ मधील एकूण १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी स्वतः प्रशालेला भेट दिली. शिक्षकांनी घेतलेली अतोनात मेहनत आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश याबद्दल गावकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा खास सत्कार करून त्यांना शाबासकी दिली. या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना जितेंद्र गावकर यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचे विशेष अभिनंदन केले. या कार्यक्रमाला जितेंद्र गावकर यांच्यासोबत बाबुराव तेंडुलकर आणि प्रशांत नार्वेकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रशालेचे शिक्षक बांदिवडेकर, सावंत, गावडे आणि ढवण उपस्थित होत्या. शाळेने शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे सध्या सावंतवाडीसह संपूर्ण जिल्ह्यातून आणि सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.










