LIVE UPDATES

वादळी पावसामुळे तब्बल ६७ गावांमधील वीज पुरवठा खंडीत

दुरुस्ती सुरू, ४२ पथके कार्यरत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 16:12 PM
views 13  views

  • जनतेला संयम ठेवण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस, वादळी वाऱ्यामुळे  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि वीज खांबांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली असून बाधित भागांमध्ये शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.


जिल्ह्यात सध्या ११ केव्हीचे १७ उच्चदाब फीडर, ३३ केव्हीचे २ उच्चदाब फीडर तसेच ६७ गावे वीजपुरवठ्याच्या दृष्टीने बाधित झाली आहेत. वादळ आणि अतिवृष्टीमुळे ७३ उच्चदाब वीज खांब आणि १४३ लघुदाब वीज खांब कोसळल्याने अथवा नुकसानग्रस्त झाल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणने २९ एम्पॅनेल्ड एजन्सी आणि १३ बेरोजगार अभियंता एजन्सी अशा एकूण ४२ पथकांच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पावसाचा जोर, चिखल, दरडी कोसळण्याचा धोका आणि दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत कर्मचारी आणि तांत्रिक पथके अखंडपणे कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी वीज खांब उभारणे, तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करणे, झाडांच्या फांद्या हटविणे आणि सुरक्षिततेची खात्री करून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक ती सर्व दक्षता घेऊनच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.‌ महावितरणने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना सांगितले आहे की, दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून, वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, तुटलेल्या वीजवाहिन्या अथवा नुकसानग्रस्त वीज उपकरणांच्या जवळ जाणे टाळावे आणि अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ महावितरणच्या स्थानिक कार्यालयाला अथवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.