LIVE UPDATES

बोगस डॉक्टरांविरोधातील जिल्हास्तरीय समितीवर प्रा. सुरेश पाटील यांची नियुक्ती

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 16:07 PM
views 9  views

वैभववाडी : बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीवर ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून ग्राहक संस्थेच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. पाटील हे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

नियुक्तीनंतर प्रा. पाटील म्हणाले,  जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच "बोगस वैद्यकीय व्यवसायमुक्त सिंधुदुर्ग" घडविण्याच्या उद्देशाने प्रशासनासोबत समन्वय साधून प्रभावी काम करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.